Sunday, January 19, 2014

रिक्षाचालकाच्या मुलाने जिंकले सुवर्ण

गुजरात तंत्रज्ञान विद्यापीठाच्या 62 हजार 800 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान; 143 विद्यार्थ्यांना सुवर्ण अहमदाबाद  : घरात अठरा विश्‍व दारिद्य्र असतानाही उच्च शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगलेल्या एका रिक्षाचालकाच्या मुलाने अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर परीक्षेत सुवर्णपदक जिंकून आपल्या पित्याला एक अनोखी भेट दिली. गुजरात तंत्रज्ञान विद्यापीठाच्या (जीटीयू) तिसऱ्या पदवीदान सोहळ्यात सुमारे 62 हजार 687 विद्यार्थ्यांना पदवी व पदविका प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. राज्यपाल डॉ. कमला बेनिवाल, कुलगुरू अक्षय अग्रवाल व अध्यक्ष एस. मंथा यांच्या हस्ते या प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. 
चांदखेडा येथील जीटीयूच्या प्रांगणात आयोजित या सोहळ्यात वेगवेगळ्या विभागांच्या 143 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. मात्र अशा विद्यार्थ्यांमध्येच ऑटो रिक्षाचालकाचा मुलगा असलेल्या 25वर्षीय निशांतकुमार याचाही समावेश आहे. त्याने सिव्हिल विभागातील पदव्युत्तर शिक्षणात ही सर्वोत्तम कामगिरी केल्याने त्याचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. झारखंड येथील रहिवासी असलेल्या निशांतकुमारचे वडील रिक्षाचालक आहेत; तर त्याची आई घरकाम करते. 

अन्य विद्यार्थ्यांमध्ये मोरबी येथील पीयूषकुमार कुंदरिया याने सिरॅमिक तंत्रज्ञानामध्ये अव्वल क्रमांक मिळविला. त्याने सांगितले, की अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना सलग तीन वर्षे वैयक्तिक व अन्य समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागले. मात्र तरीही लक्ष्यापासून आपण दूर गेलो नाही. आपल्याला स्वत:चा सिरॅमिक उद्योग उभारण्याचे स्वप्न असून, आपण ते पूर्ण करणार असल्याचे त्याने सांगितले. 
आईवडिलांनी घडविले... निशांतने सांगितले, की माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी खूप काही केले आहे. आता त्यांच्यासाठी काम करण्याची माझी वेळ आहे. मला बडोदा येथे नोकरीही मिळाली असून, तेथे राहण्यासाठी आपल्यासोबत आई व वडिलांनाही आणणार आहे. त्यांनी कठीण परिश्रमातून मला घडविल्यानंतर आता ते त्यांच्या आयुष्यात समाधानी आहेत.

No comments:

Post a Comment